राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा- सिकंदर शहा
राज्यातील अस्थिर सरकारमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हतबल
यवतमाळ शहर प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यवतमाळ जिल्हयात तर कापूस, सोयाबिन सह सर्वच पिकांची वाट लागली आहे. अशाही परीस्थितीत पिकविमा कंपणी, केन्द्र तसेच राज्य सरकार गंभीर दिसून येत नाही. गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेला पाऊस थांबायला तयार नाही. या पावसामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
गेल्या काही वर्षापासून यवतमाळ जिल्हयात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागीलवर्षी सुध्दा परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. दुसरीकडे पिक विमा कंपणीने सुध्दा मोजक्याच शेतक-यांना पिकविमाचा लाभ दिला. आता तीच परीस्थिती खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने कापूस, सोयाबिन तसेच इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासोबतच पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने भाव गगनाला भिडले आहे. शेतात पाणी साचल्याने तसेच नदी, नाले काठची शेती तर खरडून निघाली आहे. अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतरही सरकार तसेच पिकविमा कंपणी मात्र याकडे गंभीरतेने बघायला तयार नाही. राजकीय नेते आपल्याच भांडणात व्यस्त असल्याचे दिसून येते. सध्या राज्याचे लक्ष उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंन्द्र फडणवीस यांच्या हालचालींकडे लागले आहे. राज्यातील राजकीय घडामोडी शेतक-यांसाठी जीवघेण्या ठरत आहे. केन्द्रातील सरकार सुध्दा महागाई तसेच शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे सोडून इतर राज्यातील सरकार पाडण्यात मशगुल आहे. यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळापैकी 95 मंडळात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी झाली आहे. जुलै मध्ये 451 मी.ली. पाऊस झाला, तो जुलै महिन्याच्या सरासरी पेक्षा 272 टक्के जास्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3318 नागरिकांना सुरक्षीत स्थलांतरीत करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे 2066 घरांचे अंशत: तर 20 घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. 60 जनावरे मृत्यूमुखी पडली. पेरणी झालेल्या 9 लाख हेक्टर पैकी जवळपास 30 टक्के शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच परीस्थिती राज्यात आहे. त्यामुळेच ओला दुष्काळ घोषीत करुन तातडीने मदत देण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.
आंदोलनाशिवाय पर्याय नाही
शेतकरी हा नैसर्गीक आपत्ती ओढवल्यास आर्धिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता पीकविमा काढत असतो. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी 9 लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही पिकविमा कंपणी हालचाल करायला तयार नाही. दुसरीकडे प्रशासनाने सर्वेक्षणाला गती दिलेली नाही. त्यामुळे शेतक-यांना तातडीने मदत न दिल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नसल्याचा इशारा सिकंदर शहा यांनी दिला आहे.