आर्णीच्या अजयच्या खुनातील दोन आरोपींना अटक ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
आर्णी : अजय अवधूत तिगलवाड याच्या खुनातील फरार दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता वानखडे आणि ओम बुटले अशी त्यांची नावे आहे. दोघांनाही विविध ठिकाणावरून अटक करण्यात आली.
आरोपी दत्ता वानखडे याला स्वतः ठाणेदार केशव ठाकरे यांनी भानसरा येथील जंगलामधून चाकूसह ताब्यात घेतले. एलसीबी चमूने दुसरा आरोपी ओम बुटले याला पुलगाव, जि. वर्धा येथून ताब्यात घेतले. या दोघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे करीत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री खून झाल्यानंतर दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी कोळवण येथील जमाव गोळा झाला होता. ठाणेदार केशव ठाकरे यांनी ग्रामस्थांचा रोष, संताप लक्षात घेता दोन्ही आरोपींच्या कुटुंबीयांनी त्वरित सुरक्षितस्थळी हलविले होते. घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपींच्या घरावर कोळवणचे ग्रामस्थ गेले होते. तेथे कोणीच न भेटल्याने ते परतले.
*ठाणेदारांची सतर्कता*
अजयच्या खुनातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केले होते. काही ग्रामस्थ आरोपींच्या घरावरही गेले होते. ही शक्यता लक्षात घेऊन ठाणेदारांनी सतर्कता बाळगली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.