जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सीईओंनी दिला राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर
यवतमाळ गेल्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणावरून सतत चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद मिरगे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मिरगे यांनी दिलेला राजीनामा मंजूर देखील करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड होत नाही तोच बँकेच्या सीईओंनी राजीनामा दिला. त्यामुळे बँकेत पुन्हा खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या राजीनाम्याच्या कारणावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले होते. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अनेक नाट्यमय घडामोडीनंतर दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा नव्या अध्यक्षांच्या निवडी संदर्भात खलबते बँकेत सुरू झाले होते. त्यात महा विकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला होता. या निवडी प्रसंगी अनेक संचालक अध्यक्षपदासाठी इच्छुक होते.
चुरशीच्या ठरलेल्या या निवडीमध्ये काँग्रेसचे मनिष पाटील महा विकास-1 आघाडीत एकमत झाल्याने अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांची निवड झाल्यानंतर बँकेतील सर्व बाबी आता पूर्वपदावर येतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद मिरगे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती बाहेर येण्यापूर्वीच नवीन अध्यक्ष मनीष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मिरगे त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला हे विशेष.