तीन अट्टल गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार
शेतीसाहित्यासह इतर चोरीचे गुन्हे करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना यवतमाळ, वर्धा व अमरावती जिल्ह्यांतून एक वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कळंब पोलिस ठाण्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ही कार्यवाही करण्यात आली.
राजपाल शंकरराव नगराळे (वय ४३, रा. बोरगाव मादनी) शुद्धोधन चंद्रमणी चहांदे (वय २१, रा. मेंढला) अजय पांडुरंग बरडे (वय २६, रा. बोरगाव (मादनी) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांनी स्वतःची टोळी बनवून कळंब, बाभूळगाव, यवतमाळ ग्रामीण हद्दीत शेती साहित्य व इतर चोरीचे गुन्हे केले. त्यांचा गुन्हेगारी अभिलेख २०२१ पासूनचा आहे. वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी कळंबचे ठाणेदार यांनी हद्दपार करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावासंबंधाने प्रकरण चालवून पोलिस अधीक्षकांनी हद्दपारीचा आदेश पारीत केला. या टोळीस संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून, वर्धा जिल्ह्यातील देवळी व पुलगाव आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, तिवसा या तालुक्यातून एक वर्षापासून हद्दपार केले. प्रत्येकावर दहा ते पंधरा चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.