सोनसाखळी चोरट्यास अटक, चारचाकीसह मोबाइल जप्त.

पुसद मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यास वसंतनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चारचाकी, मोबाइलसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे करण्यात आली.

 

 

सचिन बाळू पवार (२७) रा. पाथर्डी, अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत चोरट्याने अडीच लाखांची सोनसाखळी चोरी केल्याची तक्रार ५ डिसेंबर रोजी अभिजित किशोर पानपट्टे (३२) रा. हनुमान वॉर्ड, पुसद यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान रॅलीतील मोबाइलमध्ये काढलेले फुटेज व फोटो तपासत असताना एका व्हिडिओत संशयित इसम सोनसाखळी चोरताना आढळून आला. फोटोवरून ओळख पटवित असताना आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. त्यावरून पथक ७ डिसेंबर रोजी रवाना करण्यात आले. जामखेड येथील जगदंबा कला केंद्रात आरोपी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून, अटक केली.
चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. सोनसाखळी चारचाकी वाहनामध्ये असल्याचे सांगितले. पथकाने अडीच लाखांची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेली एम. एच. १४ डीटी ५८१० क्रमांकाची चार लाखांची चारचाकी, दीड हजारांचा एक मोबाइल असा एकूण सहा लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वसंतनगरचे ठाणेदार प्रवीण नाचनकर, पीएसआय योगेश जाधव, अशोक चव्हाण, मुन्ना आडे, संजय पवार, नितीन आडे यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed