जाहिरनाम्यातील निश्चय पुर्ण करण्याची जबाबदारी माझी- दिलीप निंभोरकर

प्रतिनिधी यवतमाळ:-अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील शिक्षक भारतीचे उमेदवार दिलीप निंभोरकर यांनी आज शिक्षकांसाठीच्या कॅशलेस योजनेसह सात निश्चयी जाहिरनामा प्रकाशित केला. या जाहिरनाम्यातील निश्चय पुर्ण करण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही सुध्दा त्यांनी याप्रसंगी सर्व शिक्षक बंधुंना दिली आहे.
विनाअनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन देण्याचा निर्धार करून सर्व शिक्षकांसाठी सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचा निश्चय शिक्षक भारतीने केला आहे. त्याच अनुषंगाने शिक्षक भारतीचे उमेदवार दिलीप निंभोरकर यांनी आपला सातसुत्री जाहिरनामा अमरावती येथे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशित केला. यवतमाळ येथे सुध्दा जाहिरनामा प्रकाशित करुन प्रतिंचे वाटप सुरु करण्यात आले आहे. दिलीप निंभोरकर हे अमरावती विभागातून शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यास पुढील शंभर दिवसातच विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांना वेतन देण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आमदार कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत जुनीच पेंशन योजना लागू करण्यात येईल, राज्यातील शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा कुठेही उपलब्ध व्हावी यासाठी सावित्री फातिमा शिक्षक कुटूंब कॅशलेस आरोग्य योजना राबविणार, पॉलिटेक्निक तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्तीची रक्कम मिळवून देणार, सामाजिक न्याय विभागातील अपंग शाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळवून देऊ, कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळवून देणार तसेच एच.एस.सी. व्होकेशनल अभ्यासक्रमाची रूपांतरण प्रक्रिया थांबवून सक्षमीकरण करणार असा एकूण सातसुत्री निश्चयी जाहिरनामा शिक्षक भारतीच्या वतीने आज प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी दिलीप निंभोरकर यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख. सुभाष मोरे, संदीप तडस, योगेश निंभोरकर, रामदास इंगळे, प्रा.कमलाकर पायस, सुधाकर तलवारे, साहेबराव पवार उपस्थित होते.
विधीमंडळात उठेल शिक्षकांचा आवाज
खूप लांबलचक आणि घोषणा देणारा जाहिरनामा आमचा नाही. जे सात निश्चय जाहिरनाम्याच्या माध्यमातून मी केले आहेत. ते पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी माझी असेल. जाहिरनाम्याच्या माध्यमातून जी वचने दिली आहेत. ती पुढील शंभर दिवसातच पूर्ण करण्याचा निर्धार आमचा आहे. मला संधी दिल्यास विधीमंडळात आवाज उचलून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसनार नाही.
दिलीप निंभोरकर