यवतमाळ भारतीय संस्कृतीमध्ये ज्या १४ कला आणि ६४ विद्या मानल्या जातात, त्यातील एक महत्त्वाची कला म्हणजे रांगोळी काढणे होय. अगदी रामायण-महाभारतातसुद्धा रांगोळीचा उल्लेख आढळतो. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात रांगोळी शुभ मानली जाते. पौराणिक मान्यतेनसार, रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही. अशी ही रांगोळी यंदाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
गणेश उत्सव व जेष्ठागौरी उत्सवाच्या नंतर घटस्थापना, दसरा सण उत्सवात साजरा करण्यात आला. यात रांगोळी खरेदी मोठी उलाढाल झाली आहे. येत्या काही दिवसात दिवाळी साजरी होणार आहे. या प्रत्येक सणाला महिला वर्ग रांगोळी काढण्यासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आतापासूनच विविध रंगांच्या रांगोळ्या बाजारात उपलब्ध आहेत व महिला वर्ग त्या खरेदी करताना दिसत आहे. यासोबतच रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारचे डिझाइन व आकाराचे साचे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत दहा ते पन्नास रुपयापर्यंत आहे. स्वस्तिक, वेल, फुल, गणपती, मोर, पिंड,शुभ लाभ आदी आकारातील साचेदेखील विक्रीसाठी आलेले आहेत.