गोवंश करणारी दोन ट्रक पकडले
गोवंश करणारी दोन ट्रक पकडले
कत्तलीसाठी नेणाऱ्या १२१ जनावरांची सुटका
पांढरकवडा नागपूर-हैदराबाद रोडवरील केळापूर टोल प्लाझाजवळ पोलिसांनी सोमवारी पहाटे ५ वाजता गोवंशाची तस्करी करणारे दोन ट्रक पकडले. ट्रकमधून गोवंश जातीची एकूण १२१ जनावरे कोंबून नेत असताना तस्करांच्या मुसक्या आवळल्या. यात ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार चेकिंग करण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा हद्दीत गुन्हेगार चेकिंग करीत असताना रात्री १२:३० वाजता पथकास खबर प्राप्त झाली. नागपूर-पांढकरवडा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर काही इसम हैदराबादकरिता दोन ट्रकमधून (क्र. एमएच २६ एन ११३७ व क्र, सीजी २४
एस ७६६७) अवैधपणे गोवंशाची तस्करी करीत आहे. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोल प्लाझा येथे सापळा रचून संशयित ट्रक थांबविले. पंचाच्या समक्ष दोन्ही ट्रकची झडती घेतली असता गोवंशीय बैल, गोन्हे असे एकूण १२१ जनावरे कोंबलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे ट्रकचालक मोहंमद हातम अब्दुल नवी (४९, रा. दुर्गा चौक, रोशनपुरा, मूर्तिजापूर, जि. अकोला), मोसीन अली सैयद मोबीन (४५, रा. वॉर्ड क्रमांक १, रेत, ता. अकोट) व ईरशाद उल्लाखा किस्मत उल्ला खाँ (३२, रा. पठाणपुरा) या तिघांना अटक केली.
ही कारवाई सपोनि अजयकुमार वाढवे, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके आदींनी केली.