_______मनःविषाद_______ शब्दरचना पराग पिंगळे यवतमाळ

_______मनःविषाद_________
मित्र,सवंगडी,भ्राता माझे
काही उभे विरोधात,
सांग ईश्वरा त्राण लढण्या
आणू कसे उरात।।
दुःख होते,दाहही होतो,
युद्ध नाही मज मनात,
स्वजनांना हरवूनी मजला
ना दिसे लाभ कशात ।।
सुख,समृद्धी आणि संपत्ती
मी मागितली जयांसाठी,
विसरून मैत्री स्वार्थासाठी
ते पुढे ठाकले युध्दासाठी।।
सुख नको,नको ते राज्य
मनी पीडा छळे अपरंपार,
ते जरी लढण्या आले
मला नको काही मजसाठी ।।
बुद्धी भ्रष्ट कशी झाली हे
ना सुचे काही तयांना,
पदासाठी आणि स्वार्थासाठी,
ते उभे कुलक्षणाला।।
बुद्धिमान आम्ही असोनी
आहे खेद मज मनात,
या क्षणी धनुष्य त्यागतो
नको प्रतिकार या क्षणाला ।।
अश्रू नयन,करुणा व्याप्त
व्याकुळ असा मी पार्थ,
सांग माधवा तू मज काही
ऐक हाक माझे मनी आर्त ।।